चंद्रपूर : आगामी महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालपेठ येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठे व प्राचीन अशी ओळख असलेल्या महाशिवलिंग मंदिरात नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी मनीष महाराज, महानगर पालिका अधिकारी, मंदिर कमिटीचे सदस्य आणि भगतांची उपस्थिती होती.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसुविधांचा विचार करून स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहतूक नियोजन तसेच इतर मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सविस्तर आणि काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी दिले. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला.
चंद्रपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीसह विविध धार्मिक सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये महाशिवरात्रीचा सण विशेष महत्त्वाचा असून दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शिव मंदिरात दर्शनासाठी येतात. ही परंपरा अधिक सुस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी नियोजन बैठक महत्त्वाची ठरली.
या नियोजन बैठकीस मंदिर समितीचे पदाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










