Advertisement

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग रिसर्च अँड टेकनॉलॉजि येथे ‘प्रयोगांद्वारे विज्ञान शिकणे’ उपक्रम.

एआयमुळे प्रगतीची नवी दालने खुली : प्राचार्य डॉ. अनिल चिताडे.
चंद्रपूर (27 फेब्रुवारी) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) चंद्रपूर द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग रिसर्च अँड टेकनॉलॉजि येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी “प्रयोगांद्वारे विज्ञान शिकणे” या विषयावर विशेष शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, एआय ही परिवर्तन घडवणारी शक्ती असून तिच्या प्रभावी वापरामुळे शिक्षण, उद्योग, आरोग्य व संशोधन क्षेत्रात नवी क्षितिजे खुली होत आहेत. “विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञानाचा वापरकर्ता न राहता संशोधक आणि नवोपक्रमकर्ता बनावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच एआयचा सकारात्मक, जबाबदार आणि नैतिक वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमासाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व मराठी विज्ञान परिषद जळगाव प्रदेशाचे सचिव प्रा. दिलीप भारंबे उपस्थित होते. त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करून विज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष प्रयोगांमधून अधिक प्रभावीपणे समजते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि चिकित्सक वृत्ती विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. चिताडे यांनी विज्ञानाची आजच्या युगातील अपरिहार्यता स्पष्ट केली. माजी राष्ट्रपती व भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत विज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण व समाजकल्याणासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोळसा उत्खननासाठी पर्यायी व पर्यावरणपूरक पद्धती विकसित करण्यासाठी विज्ञानाचा अधिकाधिक उपयोग होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
 कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन वाझलवार यांनी मराठी दिनाचे महत्त्व विशद करत विज्ञान आणि मातृभाषेतील परस्परसंबंध अधोरेखित केला. देश सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी अधिकाधिक वैज्ञानिक घडविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. “प्रयोगांद्वारे विज्ञान शिकणे” हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या विज्ञानाविषयीच्या आवडी व जिज्ञासेला निश्चितच चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्मिता काळे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. निखिल दुबे (प्रभारी, एफ.वाय. बी.टेक) यांनी केले.
Pro rcert chandrapur.
The Patil News