अर्थसंकल्पात घोषणेची अपेक्षा.
वनमंत्री गणेश नाईक यांचे सभागृहात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन, मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश.
चंद्रपूरच्या सागवान वारशाला मिळणार नवे दालन.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारण्याच्या मागणीला आता ठोस गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम स्थापन करण्याची मागणी सभागृहात ठामपणे मांडली.
वनमंत्री म्हणून कार्य करताना सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागात अनेक दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत राज्यातील वनव्यवस्थापनाला नवी दिशा दिली. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या वन विभागाला त्यांनी स्वतंत्र ओळख मिळवून दिली. राज्यभर विक्रमी वृक्षारोपण मोहिम राबवून पर्यावरण संवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले.मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सुरू केलेली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अत्यंत प्रभावी ठरली. चंद्रपूर येथे त्यांनी उभारलेली अत्याधुनिक वन अकादमी संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे. पंढरपूर येथे उभारलेले तुळशी वृंदावन उद्यान हे अध्यात्म, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम म्हणून ओळखले जाते. पर्यावरण संतुलनासाठी त्यांनी मांडलेली इको पार्क संकल्पना देखील राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात आली.असे निर्णय त्यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतले. तसेच चंद्रपूरजवळील ताडाळी येथे सुमारे दहा हजार एकर जागेत फर्निचर क्लस्टर उभारण्याची प्रक्रिया देखील त्यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे. या क्लस्टरमुळे वनाधारित उद्योगांना चालना मिळून स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठे बळ मिळणार आहे.
विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वनमंत्री कार्यकाळातील कामगिरीचे विशेष कौतुक केले.
वनमंत्री म्हणून कार्य करताना सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन सचिव विकास खारगे यांची जोडी लोकहितकारी निर्णयांसाठी प्रसिद्ध होती. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांना स्पष्ट उद्दिष्टे देणे आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता होत आहे की नाही यावर काटेकोर देखरेख ठेवणे, ही त्यांची कार्यशैली होती.
बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारण्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे सादर केला असून या प्रकल्पासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडून वनमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळविल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीची प्रक्रिया आता अधिक वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून शासनाला लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडणारे नेतृत्व म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. त्यामुळे बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारणीची ही महत्त्वपूर्ण मागणी प्रत्यक्षात उतरून चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन, संशोधन आणि आर्थिक विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









