Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
आतापर्यंत 53 हजार 473 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र.
पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन.
चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची चवथी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात चंद्रपूर जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 682 तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 433 शेतकरी सभासदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यातील 53 हजार 473 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.
महाराष्ट्र शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या, दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या तसेच दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी रु. 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे.
महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर राज्यातील बँकांनी एकूण 31.17 लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 61 हजार 101 कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली. यापैकी आतापर्यंत 53 हजार 473 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे
कर्जमाफी यादीत समाविष्ट शेतकऱ्यांनी दि. 31 मार्च 2026 रोजीच्या आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करावी. तसेच नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून, दि. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी मयत शेतकरी तसेच वयोवृद्ध आणि बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित केली आहे.
पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मंजूर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे चवथ्या यादीत नाव असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी केले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: