Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 06 : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय येथे क्लेफ्ट लिप व पॅलेट (Cleft Lip and Palate) असलेल्या बालकांसाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या विशेष तपासणी शिबिरास बालक व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रे तसेच शाळांमध्ये बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान आढळून येणारे जन्मजात व्यंग, आजार, विकासात्मक विलंब तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांचे वेळेत निदान करून संबंधित बालकांना आवश्यकतेनुसार पुढील तपासणी, तज्ज्ञ उपचार, शस्त्रक्रिया व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. याच अनुषंगाने क्लेफ्ट लिप व पॅलेट असलेल्या बालकांना आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये मिशन स्माईलच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून 12 बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यापैकी 6 बालक शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे निश्चित करण्यात आले. पात्र बालकांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. पात्र बालकांना शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून क्लेफ्ट लिप व पॅलेट या जन्मजात विकृतीने प्रभावित आतापर्यंत एकूण 230 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.
या माध्यमातून संबंधित बालकांना केवळ शारीरिक विकृतीवर उपचार मिळत नसून त्यांच्या आहार, बोलणे, चेहऱ्याचा विकास, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभाग यामध्येही सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होत आहे. क्लेफ्ट लिप व पॅलेट ही बालकांमध्ये आढळणारी जन्मजात विकृती असून, योग्य वयात योग्य तज्ज्ञांकडून उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया केल्यास बालकांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा बालकांचा लवकर शोध घेणे, त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी करणे आणि त्यांना वेळेत उपचाराशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ही प्रक्रिया सातत्याने राबविण्यात येत आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजातील गरजू व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे, बालकांमधील आजार व जन्मजात व्यंगांचे लवकर निदान करणे आणि आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांना आवश्यक उपचारांचा खर्च परवडत नसला तरी शासकीय आरोग्य यंत्रणा व संबंधित आरोग्य कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पालकांनी आपल्या बालकांमध्ये जन्मजात व्यंग, विशेषतः ओठ व टाळूशी संबंधित विकृती आढळल्यास लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: