The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली.

News Image

मोबाईलवरून खतांची आगाऊ नोंदणी.

क्यूआर कोडद्वारे खरेदीची सुविधा.

चंद्रपूर, दि. 19 : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची खरेदी सुलभ व पारदर्शक पद्धतीने करता यावी, यासाठी कृषी विभागामार्फत ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीच्या तिसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून त्याची अंमलबजावणी 22 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे खतांची आगाऊ नोंदणी करून क्यूआर कोडच्या माध्यमातून अधिकृत विक्रेत्यांकडून खत खरेदी करता येईल.

शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत ‘एफएफएस’ ॲप डाऊनलोड करून राज्याची निवड करावी. त्यानंतर आधार प्रमाणीकरण अथवा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) व ओटीपीद्वारे लॉगिन करावे. ॲपमध्ये स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावरील जमिनीचा जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे क्रमांक आणि लागवड केलेल्या पिकाची माहिती नोंदवावी.

कृषी विद्यापीठाच्या अथवा खत वापराच्या शिफारशीनुसार आवश्यक खतांचा प्रकार व बॅगांची संख्या निवडता येईल. एकाच अर्जातून एकापेक्षा अधिक खतांची मागणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर जवळच्या नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध साठा पाहून विक्रेत्याची निवड करावी. खत खरेदीसाठी शेतकरी स्वतः जाणार की त्यांचा प्रतिनिधी, याची माहिती नोंदवून प्रमाणीकरण पूर्ण करावे.

क्यूआर कोडची वैधता 72 तास : नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला स्वतंत्र टोकन व क्यूआर कोड मिळेल. हा कोड 72 तासांसाठी वैध राहणार असून, या कालावधीत निवडलेल्या विक्रेत्याकडे तो दाखवून खत खरेदी करता येईल. विक्रेता कोड स्कॅन करून खत देईल व व्यवहाराची पावती उपलब्ध करून देईल. मुदत संपल्यास नव्याने नोंदणी करावी लागेल.

या प्रणालीमुळे खतांचा उपलब्ध साठा, मागणी आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.  खतांचा अनावश्यक साठा, कृत्रिम टंचाई, काळाबाजार तसेच खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती अर्थात ‘लिंकिंग’ यांसारख्या गैरप्रकारांना आळा घालणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या गरजेनुसार खतांची निवड करता येणार असून, दुकानांसमोरील रांगा कमी होऊन वेळ व श्रमाची बचत होण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांनी नवीन प्रणालीचा लाभ घ्यावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत एफएफएस ॲपचा वापर करून जमिनीची व पिकांची माहिती अचूक नोंदवावी आणि खत खरेदीसाठी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत यांनी केले आहे.

नोंदणी, शेतकरी ओळख क्रमांक, क्यूआर कोड किंवा खत खरेदी प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘संवाद सेतू’ कार्यक्रमातून पदवीधर मतदारांना आवाहन.🔔 संविधानच सर्वश्रेष्ठ, रक्षणासाठी सदैव लढत राहणार!  🔔चंद्रपूर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली.🔔दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या.🔔आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!🔔पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या.🔔मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.