The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !

News Image

पदवीधरांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सुधाकर कोहळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – आमदार सुधीर मुनगंटीवार.

 

चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी–महायुतीचे उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून पदवीधरांच्या आशा-आकांक्षांना आणि उज्ज्वल भवितव्याला नवे बळ द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी अर्थ, नियोजन व वने मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. पदवीधरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगारविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्री. सुधाकर कोहळे यांना आपले संपूर्ण सहकार्य राहील. पदवीधरांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करण्याकरिता आपण त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

श्री. सुधाकर कोहळे हे केवळ निवडणुकीपुरते जनतेसमोर येणारे नेतृत्व नाही. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी संसदीय कामकाजाचा अनुभव घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण, सर्वसामान्य नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क, कार्यकर्त्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असलेली तत्परता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती असणे आणि त्याचवेळी सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता असणे, या दोन्ही गुणांचा सुंदर संगम त्यांच्या नेतृत्वात दिसून येतो, असे गौरवोद्गार आ. मुनगंटीवार यांनी काढले.

विदर्भाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग शिक्षणातूनच जातो, या विचाराशी आपण सदैव बांधील राहिलो आहोत, असे सांगताना आ. मुनगंटीवार यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा विशेष उल्लेख केला.

नागपूर विद्यापीठाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव मिळावे, यासाठी विधिमंडळात केलेला संसदीय संघर्ष हा केवळ नामकरणाचा विषय नव्हता, तर विदर्भाच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि राष्ट्रसंतांच्या विचारांना अभिवादन करण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. शिक्षणातून ग्रामोन्नती, समाजप्रबोधन आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांचे नाव विद्यापीठाला लाभावे, यासाठी आपण सातत्याने भूमिका मांडली, असे त्यांनी नमूद केले.

चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दूरवर जावे लागू नये, आदिवासी, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावीत, या उद्देशाने स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती ही पूर्व विदर्भाच्या शैक्षणिक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाची घटना ठरली.

चंद्रपूर जिल्ह्यात देशातील अत्याधुनिक सैनिक शाळेची उभारणी, वनविषयक शिक्षण व प्रशिक्षणासाठी वन अकादमी, मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय आणि बल्लारपूर येथे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र यांसारख्या शैक्षणिक उपक्रमांमागे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका राहिली आहे.

विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या उपकेंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी व्हावी, त्यांना स्वावलंबनाची संधी मिळावी आणि महिला सक्षमीकरणाला शैक्षणिक अधिष्ठान प्राप्त व्हावे, हा त्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

याच शैक्षणिक विकासाचा पुढील टप्पा म्हणून चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन व्हावे, यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत. गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने अध्यासन केंद्र  देखील आपण स्थापन केले. चंद्रपूर–गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आधुनिक अभ्यासक्रम, संशोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण यापुढेही कटिबद्ध राहू, असे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

आजच्या काळात पदवीधरांसमोर अनेक गंभीर आव्हाने आहेत. उच्च शिक्षण घेऊनही रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय पदभरतीतील विलंब, रिक्त पदांचा प्रश्न, कौशल्यविकासाच्या अपुऱ्या संधी, उच्च शिक्षणाचा वाढता खर्च आणि नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षणाची गरज या सर्व विषयांवर सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे.

पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे केवळ विधिमंडळातील एक स्थान नसून सुशिक्षित तरुणाईच्या आशा, अपेक्षा आणि संघर्षांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आहे. पदवीधरांच्या हातातील पदवी ही केवळ कागदावरील पात्रता न राहता त्यांच्या कर्तृत्वाला संधी देणारी, रोजगाराची दारे उघडणारी आणि आत्मसन्मानाने जगण्याचे बळ देणारी ठरली पाहिजे. यासाठी अनुभवी आणि शासनाशी प्रभावी संवाद साधू शकणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

श्री. सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी आवाहन करताना आ. मुनगंटीवार यांनी पदवीधर मतदारांना विशेष विश्वास दिला. ते म्हणाले की, पदवीधरांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधीवर सोपवून आपण मोकळे होणार नाही. पदवीधरांच्या प्रश्नांवर शासनाशी समन्वय साधणे, संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणे, आवश्यक त्या धोरणात्मक निर्णयांसाठी प्रयत्न करणे आणि विदर्भातील युवकांना न्याय मिळवून देणे, या प्रत्येक टप्प्यावर आपण श्री. सुधाकर कोहळे यांच्या सोबत राहू.

चंद्रपूर, गडचिरोलीसह संपूर्ण नागपूर विभागातील पदवीधरांच्या शैक्षणिक, रोजगारविषयक आणि व्यावसायिक अडचणींना वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कार्य करू. पदवीधरांच्या समस्या आमच्यासाठी केवळ निवडणुकीचा विषय नाहीत, तर त्या सोडविणे ही आमची सामाजिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नागपूर विभागातील पदवीधर मतदार हा सुजाण, अभ्यासू आणि समाजाला दिशा देणारा घटक आहे. त्याचे एक मत हे केवळ उमेदवार निवडण्यासाठी नसून पुढील काळातील शिक्षण, रोजगार, नवकल्पना आणि विदर्भाच्या प्रगतीची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

श्री. सुधाकर कोहळे यांच्या रूपाने विधानसभा कामकाजाचा अनुभव असलेले, जनतेशी नाळ जोडलेले आणि लोकांच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याची तयारी असलेले नेतृत्व पदवीधरांना उपलब्ध झाले आहे. त्यांच्या अनुभवाला पदवीधरांच्या विश्वासाची जोड मिळाल्यास या मतदारसंघातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.आपल्या एका मतातून एका उमेदवाराचा विजय घडणार आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हजारो पदवीधरांच्या आशा-आकांक्षांना नवे बळ मिळणार आहे. आपल्या स्वप्नांना समजून घेणारे, आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठविणारे आणि आपल्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व निवडण्याची ही संधी आहे. श्री. सुधाकर कोहळे यांना भरघोस मतांनी विजयी करा. पदवीधरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत,असे भावपूर्ण आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !🔔पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद.🔔खाजगी आस्थापनेतील मतदारांना मतदानासाठी चार तासांची सवलत.🔔गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन.🔔उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन.🔔मधुमक्षिका पालन व मध अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती.🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पाच दिवस रंगलेल्या महोत्सवाची भव्य पालखी सोहळ्याने सांगता.