The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती.

News Image

आरवट-शिवणी येथे श्रमदानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम.

अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या वतीने चंद्रपूर तालुक्यातील आरवट-शिवणी येथील सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.

कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने तहसील कार्यालय, चंद्रपूर व चंद्रपूर महसूल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरवट-शिवणी परिसरात वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

आरवट-शिवणी येथील सराई नाल्यावर सुमारे 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि अंदाजे 2 मीटर खोल आकाराच्या बंधाऱ्याची लोकसहभागातून निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार असून, जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढून भूजल पुनर्भरणास चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच परिसरातील विहिरी, शेती आणि इतर जलस्रोतांना याचा फायदा होऊ शकणार आहे.

दुष्काळ निवारणासाठी स्थानिक उपाययोजनांवर भर

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडविणे, भूजलसाठ्यात वाढ करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यासारख्या कमी खर्चाच्या व लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना पाणीटंचाई निवारणासाठी उपयुक्त ठरू शकतात.

अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

या श्रमदान उपक्रमात उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे व ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने व त्यांचे पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी, स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, चंद्रपूर मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, आरवट येथील तलाठी अनूप वघारे, योगेश सागुळले तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

जलसंवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासकीय उपाययोजना पुरेशा नसून नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. गावागावांत उपलब्ध नाले, ओढे आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी जलसंवर्धनाच्या उपक्रमांत सहभागी व्हावे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔मौजा वाठोड्यात घरझडतीत देशी दारूच्या  २,५०० बाटल्या जप्त;      १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.🔔एसआयआर-2026 अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.🔔लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती.🔔पदवीधर बेरोजगारांच्या निश्चित रोजगारासाठी कटिबद्ध.🔔चंद्रपुरात निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद  संपन्न.🔔दुष्काळावर मात करण्यासाठी सिंदेवाहीत जलसंधारणाची लोकचळवळ!🔔मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रमात आता चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश.🔔आठ वर्षा पासून फरार पाहिजे असलेला आरोपी स्था.गु.शा. चंद्रपूर च्या ताब्यात.