Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल; बुद्ध-भीम गीतांनी परिसर धम्ममय.
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा दीक्षाभूमीवर सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित राहिल्याचे आयोजकांनी नमूद केले. बुद्धवंदना, संविधानिक मूल्यांचा जागर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या स्मरणाने संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता. स्वाभिमान, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी संविधानाचे संरक्षण, बौद्ध संस्कृतीचे संवर्धन आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनावर भर दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून बुद्धिष्ट कल्चरल फाऊंडेशन, दिल्लीचे अध्यक्ष भदन्त दीपांकर सुमेधो, ज्येष्ठ लेखक व व्याख्याते तथा ‘जग बदलणारा बाप माणूस’ या पुस्तकाचे लेखक डॉ. जगदीश ओहोळ आणि आग्रा, उत्तर प्रदेश येथील धम्मप्रकाश बौद्ध उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोबरागडे, कुणाल घोटेकर, सचिव वामनराव मोडक, संस्थेचे सदस्य शैलेन्द्र शेंडे, राकेश गेडाम, राजेंद्र नाईक, संविधान जागर उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर आणि डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अरुण घोटेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच बुद्धांचा धम्म, भारतीय संविधान आणि सामाजिक बंधुता ही मूल्ये आचरणात आणून पुढील पिढीपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध व्याख्याते आणि ‘जग बदलणारा बाप माणूस’ या पुस्तकाचे लेखक डॉ. जगदीश ओहोळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात, “स्वाभिमान जिवंत ठेवणारा हा सोहळा आहे,” या शब्दांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजात नवचैतन्य निर्माण केले, असे सांगत त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा पट भावपूर्ण आणि काव्यात्म शैलीत उलगडला. बाबासाहेबांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजही सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी आहेत, असा संदेश त्यांच्या भाषणातून मिळाला.
धम्मप्रकाश बौद्ध यांनी प्रस्थापित ईश्वरी व्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर भाष्य करत तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. प्रत्येकाने पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी नव्या पिढीने त्याग आणि संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.
जातीव्यवस्थेचे उच्चाटन झाल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समताधिष्ठित समाजाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी बौद्ध धम्माच्या मूल्यांचा स्वीकार करून सामाजिक एकात्मतेला बळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘जाती तोडो, समाज जोडो’ हा नारा देत त्यांनी समतामूलक समाजनिर्मितीचे आवाहन केले.
श्रद्धेय भदन्त दीपांकर सुमेधो यांनी आपल्या मार्गदर्शनात, “बाबासाहेब हे वाचण्याचा नाही, तर समजण्याचा विषय आहे,” असे सांगत बाबासाहेबांच्या जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना सुभेदार रामजी यांचे सुपुत्र म्हणून त्यांच्या संघर्षमय जीवनाची पार्श्वभूमीही समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संविधान जागर उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर यांनी केली. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक परिवर्तन, आत्मसन्मान आणि संविधानिक जाणीव जागृत करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस असल्याची भावना या सोहळ्यातून व्यक्त झाली.
यावेळी नांदेड येथील नरहर सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीला बाबासाहेबांचा अस्थिधातू कलश प्रदान केल्याबाबत संस्थेचे सदस्य शैलेन्द्र शेंडे यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्य सोहळ्यानंतर रात्री ९.३० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बोधिसत्व गाथा सादरकर्ते शाहीर राजेश शिर्के व शाहिरा दीक्षा शिर्के आणि त्यांच्या मुंबई येथील संचाने सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून सामाजिक समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला.
या सोहळ्याला भिक्खुसंघासह बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनोज सोनटक्के यांनी केले, तर संस्थेचे सचिव वामनराव मोडक यांनी आभार प्रदर्शन केले. ७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन यशस्वी करण्यासाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: