“पहिलं प्रमाणपत्र फ्री आहे, तरीही पैसे मागितले जातात” – नागरिकांना झोन 3 मध्ये पाठवून वसुली.
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात लोकसेवा हमी कायद्याची सर्रास पायमल्ली होत असून, नागरिकांकडून बेकायदेशीर पैसे मागितले जात असल्याचा गंभीर आरोप झोन क्र. 2 च्या सभापती सौ. वैशाली प्रकाश चंदनखेडे यांनी केला आहे.
सौ. चंदनखेडे म्हणाल्या, “शासनाच्या नियमानुसार जन्म झाल्यापासून 21 दिवसात नोंदणी पूर्णपणे फ्री आहे. नोंदणीनंतर पहिले प्रमाणपत्र देखील नागरिकांना मोफत देणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रतीला फक्त ₹5 फी आहे. तसेच लोकसेवा हमी कायदा 2015 नुसार अर्ज केल्यापासून 3 दिवसात दाखला देणे अनिवार्य आहे.”
परंतु मनपात नेमकं उलटं सुरू आहे:
1.पैसे मागितले जात आहेत – पहिल्या प्रमाणपत्रासाठी देखील नागरिकांकडून ₹300-₹500 रुपये मागितले जात आहेत.
2.)टाळाटाळ आणि भ्रष्टाचार – मुख्य कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना “येथे काम होणार नाही, झोन क्र. 3 मध्ये जा. माझे नाव सांगा काम होईल” असे सांगून विशिष्ट ठिकाणी पाठवत आहेत.
3.) विलंब – 3 दिवसात द्यायचा दाखला 8-15 दिवसांनी दिला जातो. जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत फाईल अडवली जाते.
4.)अधिकारी गैरहजर – निबंधक आणि वरिष्ठ अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
5).उद्धट वर्तन- माहिती विचारल्यास कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात.
“दुपारच्या जेवणानंतर कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासन्तास उभे राहावे लागत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि लोकसेवा हमी कायद्याचा उद्देशच यामुळे फोल ठरत आहे,” असे सौ. चंदनखेडे म्हणाल्या.
त्यांनी आयुक्तांकडे 4 ठळक मागण्या केल्या आहेत:
1).जन्म-मृत्यू विभागात “पहिलं प्रमाणपत्र फ्री” हा बोर्ड तात्काळ लावावा
2).सर्व व्यवहार पावतीशिवाय होणार नाहीत याची खात्री करावी आणि सीसीटीव्ही बसवावा
3.) 3 दिवसात दाखला न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकसेवा हमी कायद्यानुसार कारवाई करावी
4.) नागरिकांना विशिष्ट झोनमध्ये पाठवून वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी
“नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नयेत. पावती मागावी. जर कोणी पैसे मागत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. आम्ही नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. 7 दिवसात सुधारणा न झाल्यास सर्व नगरसेवकांसह आंदोलन करू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.
संपर्क:
सौ. वैशाली प्रकाश चंदनखेडे
झोन सभापती, झोन क्र. 2
चंद्रपूर महानगरपालिका
जन्म-मृत्यू दाखला फ्री आहे तरी पैसे मागितले जातात!
शासनाचा नियम:
1). 21 दिवसात नोंदणी = फ्री
2.) पहिलं प्रमाणपत्र = फ्री
3). 3 दिवसात दाखला = बंधनकारक
टीप : हे वृत्त झोन क्र. २ च्या सभापती सौ. वैशाली प्रकाश चंदनखेडे यांनी जारी केलेल्या प्रेस नोट/निवेदनावर आधारित आहे. या वृत्तातील आरोप व दावे संबंधित लोकप्रतिनिधीचे असून, The Patil News त्यास स्वतंत्रपणे दुजोरा देत नाही. संबंधित चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही याच ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येईल.












