Advertisement

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून १४ रक्तदान शिबिरांत १,०७० जणांचे रक्तदान

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ उत्साहात राबविण्यात येत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या सेवा सप्ताहांतर्गत सामाजिक, आरोग्य व जनकल्याणकारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मतदारसंघातील ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या १४ रक्तदान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १,०७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले.

रविवारी पाताळेश्वर मंदिर परिसर, भिवापूर, गुरुद्वारा, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, वडगाव, घुग्घूस, विठ्ठल मंदिर वॉर्ड आदी ठिकाणी शिबिरे पार पडली. प्रत्येक केंद्रावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले. “एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणे ही आनंदाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

१५ ते २३ जुलैदरम्यान सुरू असलेल्या ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ अंतर्गत रक्तदान शिबिरांसह महाआरोग्य शिबिरे, योग शिबिरे, वृक्षारोपण, धार्मिक कार्यक्रम, दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण, गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

टीप : THEPATILNEWS Portal वर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, छायाचित्रे व इतर सर्व मजकूर संबंधित स्रोतांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केला जातो. बातमीतील दावे, आकडेवारी किंवा संबंधित व्यक्तींची विधाने यांची जबाबदारी संबंधित स्रोत अथवा वक्त्यांची राहील. THEPATILNEWS Portal शक्य तितकी अचूक व वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करते; तथापि, कोणतीही तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास ती निदर्शनास आणून दिल्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. THEPATILNEWS Portal ची पूर्वपरवानगीशिवाय येथील मजकूर, छायाचित्रे किंवा इतर साहित्याची संपूर्ण अथवा अंशतः पुनर्मुद्रण, प्रतिकृती किंवा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे.