नवी दिल्ली | प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सोनम वांगचुक हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अनिश्चितकालीन उपोषणाच्या १९व्या दिवशी आहेत.
भेटीनंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारने आणखी विलंब न करता सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने संवाद सुरू करावा, अशी मागणी केली. संवाद साधणे ही सरकारची कृपा नसून संविधानाने दिलेली जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.
शिक्षण सुधारणा, नवोन्मेष आणि पर्यावरण संरक्षणासाठी देश-विदेशात सन्मान मिळालेल्या व्यक्तीचे म्हणणे सरकार ऐकण्यासही तयार नसेल, तर तो देशाच्या लोकशाहीसमोरील अत्यंत गंभीर प्रश्न असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.
अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याचे सांगत, विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि सरकारवर संवादासाठी दबाव आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ज्या प्रकारे या प्रकरणात जबाबदार धरले जात आहे, त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेतृत्वानेही अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपली लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून संविधान, पारदर्शकता, शिक्षणातील न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संवाद, न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
टीप : हे वृत्त प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रकाशित करण्यात आले आहे. अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही प्रसिद्ध करण्यात येईल.













