चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपचा विजयाचा मार्ग अधिक सुकर
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय पाठिंबा मिळाला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट ) आज सोमवारी अधिकृतपणे भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतचे पाठिंब्याचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांनी चंद्रपूर महानगरातील भाजप कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द केले. यावेळी रपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाअध्यक्ष गौतम तोडे, शहर अध्यक्ष संदीप जंगम, महिला शहर अध्यक्ष आश्विनी रायपुरे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री नामदेव डाहुले, अरुण तिखे, प्रलय मशाखेत्री यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, आता या सर्व उमेदवारांनी आणि पक्षाने एकमताने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांनी भाजपच्या विकासात्मक कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत, चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भारतीय जनता पक्षावर दाखवलेला विश्वास हा चंद्रपूरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सामाजिक न्याय, समता, विकास आणि सर्वसमावेशक प्रगती या मूल्यांवर भाजप सातत्याने काम करत आहे. या विचारांशी एकरूप होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आम्हाला दिलेला पाठिंबा हा निश्चितच शक्तीवर्धक ठरेल.
चंद्रपूर महानगरपालिकेत स्थिर, सक्षम आणि विकासाभिमुख प्रशासन घडवण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी व उमेदवार भाजपसोबत खांद्याला खांदा लावून काम करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. या सहकार्यामुळे चंद्रपूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे ते यावेळी म्हणाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या जाहीर पाठिंब्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये भाजपच्या बाजूने महत्त्वपूर्ण बदल झाला असून, आगामी निकालांवर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे आहेत 12 उमेदवार
ईम, ई. एल प्रभाग राजकुमार खोब्रागडे, सुप्रशित गेडाम, बंगाली कॅम्प प्रभाग अश्विनी रायपूरे, शरद वनकर, इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग राजेशम पुल्लोरी, जटपूरा गेट प्रभाग शालीनी भगत, एकोरी प्रभाग विनोद नगराळे, महाकाली प्रभाग जयप्रकाश कांबळे, मिलन नवरखेले, बाबूपेठ प्रभाग रमेश दुर्योधन, पठाणपुरा प्रभाग बाळु आंबेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग संदीप जंगम.








