Advertisement

नर्सिंग म्हणजे समाजसेवेचे पवित्र व्रत” – आमदार किशोर जोरगेवार.

शासकीय नर्सिंग कॉलेजचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

चंद्रपूर : येथील प्रियदर्शनी सभागृहात शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वतीने नर्सिंग पदग्रहण सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नर्सिंग म्हणजे समाजसेवेचे पवित्र व्रत असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.या कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोले, डॉ. जीवने, माया आत्राम, ज्योती लोटांगडे, परिचालिका पुष्पा पोडे, कामतवार, आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, नर्सिंग हे केवळ एक व्यावसायिक क्षेत्र नसून समाजसेवेचे पवित्र व्रत आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानली जाते.

रुग्णांच्या वेदना समजून घेत त्यांना मानसिक आणि शारीरिक आधार देण्याचे कार्य परिचारिका करतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून नर्सिंग क्षेत्राकडे पाहिले जाते.ते पुढे म्हणाले की, नर्सिंग शिक्षणाच्या माध्यमातून दरवर्षी अनेक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सामाजिक बांधिलकी जपत, समर्पण आणि संवेदनशीलतेने ही तरुण पिढी आपली जबाबदारी पार पाडत आहे, याचा मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.”विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिस्त, संयम आणि सेवाभाव या गुणांचे महत्त्व पटवून दिले.

तुमच्या हातात केवळ इंजेक्शन किंवा औषध नसते, तर एखाद्या रुग्णाचा विश्वास आणि त्याच्या कुटुंबाची आशा असते. त्यामुळे प्रत्येक कृतीत संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव असली पाहिजे,”असेही ते म्हणाले. यावेळी नर्सिंग कॉलेजच्या बस खरेदीसाठी ३० लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून नर्सिंग कॉलेजच्या नवीन इमारतीसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

The Patil News