कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत.
खरीप हंगाम हा आपल्या जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या हंगामावर त्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नाचा मोठा भाग अवलंबून असतो. त्यामुळे नियोजन करताना कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. शेतकरी सुभलाम-सुफलाम झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक अधिकार्याने काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा कृषी कार्यालयात खरिप हंगाम पुर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेतकरी आणि अधिका-यांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ ढेडारे, गट विकास अधिकारी संगीता भांगरे, नायब तहसिलदार ओमकार ठाकरे, साखरवाही फार्मर प्रोडकक्शन कंपणीचे संचालक नामदेव डाहुले, प्रगतशिल शेतकरी तेजराज बरडे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कीडनाशके उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पर्यायी पिकांचे नियोजन तसेच जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. एक गाव एक वाण” या संकल्पनेप्रमाणे “एक गाव एक अवजार बँक” ही योजना राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. “शेतकर्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक अवजारे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रत्येक गावात अवजार बँक उभारणे आवश्यक आहे. या योजनेसाठी शासनातर्फे निधी देण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे ते म्हणाले.
ते पूढे म्हणाले की, बोंड अळीमुळे दरवर्षी उत्पादनात मोठी घट होत आहे. ही गंभीर समस्या असून यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तज्ञांकडून सखोल अभ्यास करून योग्य आणि प्रतिरोधक बियाण्यांची शिफारस करावी, तसेच शेतकर्यांना त्याबाबत योग्य मार्गदर्शन द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देताना त्यांनी सांगितले की, “ड्रोन तंत्रज्ञान, मृदापरीक्षण, हवामान अंदाज यांचा योग्य वापर करून उत्पादन वाढवता येते. कृषी विभागाने या सुविधा शेतकर्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम बनवावे.”
तसेच, “प्रशासन आणि कृषी विभागातील अधिकारी यांनी समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गावात जाऊन शेतकर्यांशी थेट संवाद साधा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि तातडीने उपाययोजना करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, शेतकरी समृद्ध झाला तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकार्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे असेही ते म्हणाले. बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








