Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : दि. १५ व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, अनुयायी व भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बहुजन समाज पार्टी (BSP), चंद्रपूर शहरच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात BSPच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. कार्यक्रमस्थळी पुस्तकांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच व्यावसायिक व इतर स्टॉल स्वतंत्र रांगेत नियोजित पद्धतीने लावण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांना परिसरात ये-जा करताना अडचण होऊ नये यासाठी योग्य दिशादर्शक फलक लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच BSPच्या स्टॉलसाठी निश्चित जागा उपलब्ध करून देऊन तेथे वीज व प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी विविध सुविधांची मागणी
कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता मोबाईल शौचालये, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, पार्किंगची सुविधा, वाहतूक व सुरक्षा व्यवस्था यांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व स्पष्ट मार्ग, वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकेची व्यवस्था तसेच कार्यक्रम परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिक, अनुयायी व भाविकांना कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध, सुरक्षित व सुरळीत पद्धतीने पार पडावे, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी BSP, चंद्रपूर शहरच्या वतीने करण्यात आली.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी
निवेदन देताना सौ. सोनियाताई प्रशांत उंडीरवाडे (नगरसेविका, प्रभाग क्र. १३, BSP), इंजि. विमित कोसे (शहर अध्यक्ष, BSP), प्रणित तोडे (शहर सचिव, BSP), श्री. वतन दुधे (माजी जिल्हाध्यक्ष, BSP), किशोरजी चिकाटे (बाबूपेठ-भिवापूर झोन प्रभारी) आणि श्री. जीवन कांमडे (ज्येष्ठ BSP कार्यकर्ते) उपस्थित होते.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: