The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

बालमृत्यू रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ‘सांस मोहीम’.

News Image

पाच वर्षाखालील बालकांच्या न्युमोनिया प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज.

चंद्रपूर : बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करून बालमृत्यू रोखणे तसेच बालकांचे आरोग्य व श्वसन सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून 12 नोव्हेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत ‘सांस अभियान’ राबविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी वसुमना पंत व मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्नेहल कासारे यांच्या नियोजनानुसार या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

बालकांमधील न्यूमोनिया हा बालमृत्यूच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक असून, वेळेत लक्षणे ओळखून योग्य निदान व उपचार उपलब्ध करून दिल्यास न्यूमोनियामुळे होणारे गंभीर आजार व मृत्यू टाळणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर बालकांमधील न्यूमोनियाचे लवकर निदान करणे, पालकांमध्ये आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे, आजारी बालकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि गंभीर बालकांना तातडीने उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत संदर्भित करणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख उपाययोजना : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये व इतर आरोग्य संस्थांच्या माध्यमातून बालकांची तपासणी व न्यूमोनियाच्या लक्षणांची ओळख करून घेणे, दोन महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये खोकला, सर्दी, जलद श्वासोच्छ्वास, छाती आत ओढली जाणे, यांसारख्या न्यूमोनियाच्या लक्षणांबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क करणे, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून गृहभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची पाहणी करणे व पालकांना आवश्यक मार्गदर्शन करणे.

न्यूमोनियाची लक्षणे आढळणाऱ्या बालकांना आरोग्य संस्थेत वेळेत आणण्यासाठी पालकांचे समुपदेशन करणे व आवश्यकतेनुसार तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, गंभीर स्वरूपाच्या न्यूमोनियाने बाधित बालकांना योग्य उपचारासाठी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत संदर्भित करणे व त्यांच्या उपचारांचा पाठपुरावा करणे, बालकांचे संपूर्ण लसीकरण, स्तनपानाचे महत्त्व, सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान, पूरक आहार, योग्य पोषण, हातांची स्वच्छता आणि घरातील धूरमुक्त वातावरण तसेच ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्रे, शाळा व इतर समुदायस्तरीय व्यासपीठांच्या माध्यमातून न्यूमोनिया प्रतिबंध व उपचाराबाबत जनजागृती करणे, न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नियमित सनियंत्रण, आढावा व आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

आजाराची लक्षणे : बालकाला खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. बालकाचा श्वास नेहमीपेक्षा जलद चालणे, छाती आत ओढली जाणे, दूध किंवा पाणी पिण्यास त्रास होणे, बालक सुस्त होणे किंवा झटके येणे ही धोक्याची लक्षणे आहेत.

पालकांना आवाहन : वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नयेत. न्यूमोनियाचे वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास बालकांचे प्राण वाचविणे शक्य आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘सांस अभियान’मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बेपत्ता महिलेच्या ओळखीसाठी संपर्क साधा.🔔दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना.🔔21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत पुरुष नसबंदी पंधरवडा.🔔बालमृत्यू रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ‘सांस मोहीम’.🔔28 व 29 नोव्हेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये गांभिर्याने काम करा.🔔संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार    - पालकमंत्री डॉ. अशोक उईके.🔔चंद्रपूरच्या बांधकाम कामगारांच्या किचन सेटचा प्रश्न ऐरणीवर; मंत्रालयाच्या हस्तक्षेपाची मागणी!