Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
पालकमंत्र्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा.

चंद्रपूर, दि. 26 : दुष्काळ निवारणासाठी शासन व प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या असतानाही विजेअभावी त्यातून पाणीपुरवठा होत नसल्याची बाब अत्यंत खेदजनक आहे. विजेअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना कोणतीही हयगय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
नियोजन सभागृहात आयोजित दुष्काळ निवारण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात वीजपुरवठ्याच्या निश्चित वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, मनमानी पद्धतीने वीजपुरवठा खंडित करू नये. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने राखावा. संभाव्य पाणीटंचाईमुळे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कोल वॉशरीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. दुष्काळी परिस्थितीत कोल वॉशरींना पाणीपुरवठा न करता ते पाणी नागरिकांसाठी उपयोगात आणावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करा : जिल्ह्यात ज्या ठिकाणी जमिनीत ओलावा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी तातडीने चारा लागवडीची कामे हाती घ्यावीत. पशुधनाला चारा टंचाई भासणार नाही, यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करावे. उपलब्ध स्थानिक निधीच्या माध्यमातून चारा लागवडीच्या कामांना गती द्यावी. दुष्काळ निवारणासाठी केवळ नियोजन न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
दुष्काळ निवारणाच्या कामांना गती द्यावी – आमदार सुधीर मुनगंटीवार.
रोजगार हमी योजनेच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यात अतिरिक्त चारा उत्पादन करून इतर जिल्ह्यांना चारा पुरवठा केल्यास स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यादृष्टीनेही नियोजन करावे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
कोल वॉशरींना होणारा पाणीपुरवठा बंद करावा. गावागावांतील आरओ जलशुद्धीकरण प्रकल्पांची नियमित देखभाल व दुरुस्ती करावी. माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यासाठी संबंधित निकषांमध्ये शिथिलता देण्याबाबत कार्यवाही करावी. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) खाण परिसरातील भूजल पातळीत किती घट झाली आहे, याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अहवाल सादर करावा, अशाही सूचना त्यांनी केल्या.
चंद्रपूर शहरातील अमृत-1 योजनेअंतर्गत नळजोडणी असूनही पाणीपुरवठा होत नसलेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिका आयुक्तांकडे आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले.
बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन विभाग, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग, मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने दुष्काळ निवारणासाठी करण्यात आलेले नियोजन व उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: