विसापूर : दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच NTA रद्द करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विसापूर येथे एकदिवसीय प्रतीकात्मक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपोषणात सिद्धांत पुणेकर (जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, चंद्रपूर) आणि निलजय गावंडे यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून एकदिवसीय उपोषण सुरू केले. या आंदोलनाला विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती मिळाल्यानंतर उपोषणस्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि तरुणांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर सिद्धांत पुणेकर आणि निलजय गावंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते उपोषणाची सांगता केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना सिद्धांत पुणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाल्याचा दावा केला. तसेच, शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि विद्यार्थीकेंद्री होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनात जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सुमनताई गौरकार, आशिष तितरे, समीर शेख, सुविभ उमरे, ज्ञानदीप पाझारे, संजय वाघाडे, अविनाश वाघमारे, मधुकर भोयर, अनंतसुग्रीव वानखेडे, दादाजी जीवने, लोकचंद भोयर, राजू लांडगे, संजय वानखेडे, ईश्वर वाहने, शाम वैद्य, सूरज खोब्रागडे, अरुण जीवने, सुनीताताई पुडके, अंजलीताई भोजेकर, ज्योत्सना मानकर, सुनील बूटले, संदीप पुणेकर, राहुल वनकर, संदीप वनकर, वामन गौरकार, लखन पवार तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून आंदोलनाची सांगता केली.
– THE PATIL NEWS | डिजिटल डेस्क













