Advertisement

कार्यकर्त्यांनी जनसेवा हेच ध्येय ठेवावे, प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन.

भाजपच्या दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026 चा समारोप.

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महानगर तर्फे आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्गाचा दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रशिक्षण वर्गात पक्षाच्या विविध विषयांवर अनुभवी वक्त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनात्मक मजबुती, बूथ व्यवस्थापन, पक्षाची कार्यपद्धती तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती यावर सखोल चर्चा करण्यात आली.आजच्या प्रशिक्षण वर्गात प्रदेश सचिव अर्चना डेहणकर यांनी “आपली कार्यपद्धती” या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजसेवेसाठी सदैव तत्पर असला पाहिजे, असे सांगितले.

संघटनेच्या प्रत्येक कामात शिस्त, समर्पण आणि सातत्य महत्त्वाचे असून जनतेशी आत्मीयतेने संवाद साधल्यास पक्ष अधिक सक्षम होतो, असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले,यानंतर “कार्य विस्तार व आपली दृष्टी” या विषयावर माजी आमदार गिरीशजी व्यास यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याचे वर्तन आणि प्रतिमा हीच पक्षाची ओळख असते. त्यामुळे सकारात्मकता, संयम आणि विश्वासार्हता जपत कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बूथ स्तरावर नवीन कार्यकर्ते जोडून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.“स्थायी कार्यक्रम, बूथ व्यवस्थापन व मन की बात” या विषयावर प्रदेश कार्यालय प्रमुख संजय फांजे यांनी मार्गदर्शन करताना निवडणुकीतील विजयाचा पाया बूथ स्तरावरच मजबूत होत असतो, असे सांगितले. प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून शासनाच्या योजना घराघरात पोहोचवाव्यात, असे त्यांनी नमूद केले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सकारात्मक कार्य आणि प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचत असल्याने हा कार्यक्रम जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.समारोपीय सत्रात “केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती” या विषयावर प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रशिक्षण अभियान सहसंयोजक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून त्या योजनांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या समारोपीय सत्रात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नाही, तर राष्ट्रसेवेची एक विचारधारा आहे. या विचारधारेच्या बळावर आज भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठी संघटना बनली आहे. या संघटनेचा खरा आधार म्हणजे आपल्या सारखा निस्वार्थी कार्यकर्ता. पक्षाने दिलेला प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक जबाबदारी आणि प्रत्येक आंदोलन कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळेच आज भारतीय जनता पार्टी जनतेच्या मनामनात पोहोचली आहे. या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गामध्ये विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन झाले. पक्षाची कार्यपद्धती, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया, शासनाच्या योजना आणि संघटन विस्तार यासारखे महत्त्वाचे विषय प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण आजचा काळ हा केवळ निवडणुकांचा नाही, तर समाजामध्ये सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असल्याचे यावेळी ते म्हणाले.

यावेळी आभार प्रदर्शन करतांना वर्ग प्रमूख रविंद्र गुरुनुले यांनी सांगितले कि,अतिशय शिस्तीत प्रशिक्षण अभियान संपन्न झाले. अपेक्षित सर्व वक्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे या अभियानातून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित होउन निघाणार आहे. याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.