Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी थेट लाभ वितरण.
कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन.
चंद्रपूर, दि. 29 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याचे वितरण शुक्रवार, दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुजरातमधील बनासकांठा येथून आयोजित ऑनलाइन समारंभाद्वारे देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार 796 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 48 कोटी 95 लाख 92 हजार रुपयांचा लाभ वितरित करण्याचे नियोजन आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी 1 डिसेंबर 2018 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये याप्रमाणे वार्षिक 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 व्या हप्त्याचे वितरण 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यानिमित्त 30 ऑक्टोबर हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या लाभ वितरण समारंभाचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावरही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. शेतकऱ्यांना
या संकेतस्थळावरून कार्यक्रम पाहता येणार आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टलवरील ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याचे आधार संलग्नीकरण व डीबीटी सुविधा कार्यान्वित असणे, तसेच जमीन नोंदींची पडताळणी (Land Seeding) पूर्ण असणे आवश्यक आहे. या अनिवार्य बाबींची पूर्तता न केलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पीएम किसान उत्सव दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरावर आणि नागरी सुविधा केंद्रांमार्फत (CSC) अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी नोंदणी, पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी आयोजित ‘पीएम किसान उत्सव दिवस’ कार्यक्रमात सहभागी व्हावे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती घेऊन अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी तसेच पीएम किसान योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: