Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
बल्लारपूर, ब्रम्हपुरी आणि जिवती नव्याने समाविष्ट.
चंद्रपूर, दि. 14 : खरीप हंगाम 2026 मधील पर्जन्याची तूट आणि पावसातील खंडामुळे सुरवातीला चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यात आला होता. बल्लारपूर, ब्रम्हपुरी आणि जिवती तालुके यातून वगळण्यात आले होते. मात्र 14 ऑक्टोबर 2026 च्या शासन निर्णयान्वये उर्वरीत तीनही तालुक्यांचा (बल्लारपूर, ब्रम्हपुरी आणि जिवती) दुष्काळग्रस्त यादीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुके ट्रीगर – 1 व ट्रीगर -2 मध्ये समाविष्ट झाले आहेत.
सुरवातीला राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‘ट्रीगर-1 (प्रथम कळ)’ लागू करण्यात आली होती. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश होता. यानंतर राज्यातील 19 तालुक्यांचा ट्रीगर – 2 मध्ये समावेश करण्यात आला होता. यात जिल्ह्यातील बल्लारपूर, ब्रम्हपुरी आणि जिवती तालुक्यांचा समावेश होता. आता मात्र राज्य शासनाने 305 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असून यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश केला आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता-2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे.
दुष्काळग्रस्त भागासाठी उपाययोजना व सवलती : ट्रीगर – 1 आणि ट्रीगर -2 लागू असलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्यात येणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीजपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपांना ही सूट लागू राहणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.
अन्नधान्य, चारा व पाण्याच्या उपलब्धतेवर भर : दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी व शेतमजुरांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये यासाठी शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी, शेतमजूर व इतर घटकांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासोबतच जलसंधारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय शासनाने यापूर्वी निर्गमित केलेल्या निर्देशांनुसार नागरिकांसाठी पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: