Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 11 : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर या तीन तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के क्षेत्रावर सर्वेक्षण (ग्राऊंड ट्रुथिंग) करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. यासाठी संबंधित तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची संयुक्त पथके गठित करून सर्वेक्षणाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहे.
राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 29 सप्टेंबर 2026 रोजी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील ट्रिगर-1 लागू असलेल्या 265 तालुक्यांमध्ये 100 टक्के पीकपाहणी करून भौतिक व डिजिटल स्वरूपात पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या पंचनाम्यांवर संबंधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे तसेच पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर प्रसिद्धी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पीक नुकसानीच्या नोंदींमध्ये पारदर्शकता राखण्याबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची नोंद तपासण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, शासन निर्णय 25 सप्टेंबर 2026 मधील ट्रिगर-1 यादीत समावेश नसलेल्या, मात्र दुष्काळाची तीव्रता असलेल्या राज्यातील अतिरिक्त 19 तालुक्यांमध्येही प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
संयुक्त पथकांमार्फत होणार प्रत्यक्ष पाहणी: संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पाच पिकांची निवड करून 20 टक्के सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या क्षेत्राची माहिती तातडीने तहसीलदारांना सादर करावी. त्यानंतर तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची संयुक्त पथके गठित करून प्रत्यक्ष शेतपातळीवर सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ सादर करावा. हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी कृषी आयुक्तालयामार्फत मंत्रिमंडळ उपसमितीकडे पाठविण्यात येणार आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे, प्रत्यक्ष पीक नुकसानीची स्थिती स्पष्ट करणे आणि पुढील उपाययोजनांसाठी आवश्यक अहवाल उपलब्ध करून देणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सर्वेक्षण व पंचनाम्यांची कार्यवाही गांभीर्याने आणि तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: